देवळा : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने आपली पहिली यादी काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी जाहीर केली. या जाहीर केलेल्या यादीत चांदवड देवळा मतदार संघाची ढाल पुन्हा एकदा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचेकडे सोपवली आहे. पण यापूर्वीच राहुल आहेरांनी पत्रकार परिषद घेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे घोषित केले होते. आपल्याला उमेदवारी न देता आपले भाऊ केदा आहेर यांना उमेदवारी देण्याची शिफारस त्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र ऐन वेळी राहुल आहेरांना उमेदवारी जाहीर झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
केदा नाना आहेर यांनी यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली होती. परंतु पक्षाने तिकीट न दिल्याने त्यांच्यासमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. या वादाचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात गेला असता तेथूनही केदा आहेरांची निराशा झाल्याचे समजते. केदा नाना आहेर यांना स्थानिकांनी विधानसभेची उमेदवारी करावी असा आग्रह धरला आहे. भाजपने केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्याने आता उद्या होणाऱ्या एल्गार मेळाव्यात केदा नाना काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण चांदवड देवळा तालुक्याचे लक्ष लागून आहे.