कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यापूर्वीच्या देखभालीच्या नावाखाली महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सहा तास वीज पुरवठा खंडित केला जातो. तर काही भागात वादळ-पाऊस नसताना एक तास वीज पुरवठा दररोज बंद होत आहे. दिवसाच्या उकाडयाने नागरिक हैराण आहेत. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतल्यावर पंखा, वातानुकूलित वातावरणात बसून उकाड्याचे शमन करावे, तर त्यात वीज पुरवठा बंंद होत असल्याने नागरिकांची होरपळ होत आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वाहक तारांना लागलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम महावितरण कर्मचाऱ्यांंकडून सुरू आहे. ही कामे करताना संबंधित भागाचा वीज पुरवठा बंद केला जातो. अशाप्रकारे दिवसभरात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद ठेवताना महावितरणने त्या भागात ध्वनीक्षेपक, प्रसिध्दी माध्यमातून माहिती देऊन नागरिकांना पूर्वसूचना देण्याची मागणी आहे. अशी कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण वीज पुरवठा बंद करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली, कोळसेवाडी, कैलासनगर, चिंचपाडा, एफ केबिन भागात गेल्या काही दिवसांपासून दररोज पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद केला जात आहे. यामुळे घरातील शीतकपाट, पंखे, वातानुकूलित यंत्र बंद राहत असल्याने नागरिकांना घरात सर्व सुविधा असुनही उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये लहान बाळे, वृध्द, बिछान्याला खिळून असणारे रुग्ण आहेत. त्यांचे यामध्ये सर्वाधिक हाल होतात. महावितरणचे हे अघोषित वीज भारनियमन आहे. ते तात्काळ बंद करावे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर भागात मागील दोन दिवसांपासून दिवस, रात्री पाच ते सहा वेळा वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळ, पाऊस नसताना वीज पुरवठा एक तास बंद होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर भागात मागील दोन दिवसांपासून दिवस, रात्री पाच ते सहा वेळा वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळ, पाऊस नसताना वीज पुरवठा एक तास बंद होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
