देवळा : देवळा तालुक्यातील रामेश्वर येथील भाऊसाहेब आहेर यांची कन्या शिवानी हिने महाराष्ट्र पोलीस दलात सुरू असलेल्या पोलीस भरतीत घवघवित यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलामुलींचे पोलीस होण्याचे स्वप्न असते. शिवानी देखील असेच पोलीस होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगून होती. ती गेल्या 2 वर्षापासून पोलीस दलात दाखल होण्यासाठी अथक परिश्रम करत होती. तिने अखेर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात होत असलेल्या भरतीत यश संपादन केले.
लोकराज्य मराठी शी बोलताना तिने आपली प्रतिक्रिया दिली की मी साधारण कुटुंबातील आहे असून आई -वडील शेतकरी आहेत. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की पोलीस व्हावे पण परिस्थितीमुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते की मी माझ्या वडिलांचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि आज ते मी करून दाखवले. माझे पाचवी ते दहावी शिक्षण जनता विद्यालय रामेश्वर या शाळेत झाले. व अकरावी बारावीचे शिक्षण कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा येथे झाले. महाविद्यालयात शिकत असताना मी पोलीस भरती विषयी पूर्ण माहिती घेतली आणि प्रसिद्ध अश्वमेध करिअर अकॅडमी तालुका देवळा येथे मी प्रवेश घेतला. यापूर्वी भरती दिली असता मी चार गुणांनी वेटिंग ला राहिले. या मोठ्या अपयशानंतर मी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने तयारी करायला सुरुवात केली. आणि आज माझ्या कष्टांना यश मिळाले. माझी मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयात पोलीस शिपाई पदी निवड झाली. माझे गुरु माझे आई-वडील आणि अश्वमेध करिअर अकॅडमी चे संचालक श्री चेतन परदेशी सर यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. आणि त्यांच्यामुळे माझे स्वप्न आज पूर्ण झाले.
शिवानी चे वडील शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलीला पोलीस दलात भरती होण्याकरिता तिला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी वेळोवेळी पुरवत पुरेसा प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात शिवानी चे व तिच्या आईवडिलांचे कौतुक केले जात आहे.
सहसंपादक : समाधान महाजन